शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे खळबळजनक वक्तव्य
बुलढाणा :(वृत्तसंस्था ) काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळून आला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच, राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, अशी प्रक्षोभक घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारतात उमटण्याची चिन्हे आहे.
आज बुलढाणा येथे निवडक प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसोबत बोलतांना आमदार संजय गायकवाड यांनी हे स्फोटक विधान केले. राहुल गांधी यांच्या कथित आरक्षणविरोधी विधानामुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यांना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण संपवायचे आहे. राज्यात आणि भारत देशात आरक्षणावरून आग भडकवली असताना राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन हे विधान करून आपली आरक्षणविरोधी भूमिका मांडली आहे.