यावल तालुक्यातील गाडऱ्या वनक्षेत्रामधील घटना, ३ संशयित आरोपींना घेतले ताब्यात
यावल ( प्रतिनिधी ) – सातपुड्यातील गाडऱ्याजवळ वनक्षेत्रात अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला होता. या महिलेस कुष्ठरोग असल्याने नातेवाइकांनी तिला वाळीत टाकले होते. यादरम्यान मृत्यू झाल्याने अंत्यसंस्कार न करताच तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे. पालिकेच्या मदतीने महिलेवर पोलिसांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातपुड्याच्या कुशीतील गाडऱ्या वनक्षेत्रात १४ एप्रिल रोजी लतिराम रमेश बारेला याला अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह दिसला होता. त्याने ही माहिती यावल पौलिसांना दिली. यानंतर उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलिस नाईक वसीम तडवी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. यानंतर महिलेची ओळख पटवण्यासाठीचे पोलिसांचे प्रयत्न यशस्वी झाले.(केसीएन)हा मृतदेह सुंदरीबाई अनार जमरे-भिलाला (५७, रा.मालखेडा, ग्रामपंचायत कुंभारबरडी, शिरवेल, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) हिचा असल्याचे उघड झाले. तिचा मृत्यू तिच्या गावाच्या हद्दीत झाला होता. पण, भाऊ व इतर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार न करताच मृतदेह गाडऱ्या गावाच्या वनक्षेत्रात टाकून दिला असल्याचे पोलिस तपासात दिसून आले.
पतीचे निधन झाल्याने महिला मालखेडा, या गावात भाऊ पातव्या दावर याच्याकडे राहत होती. पण, कुष्ठरोग झाल्याने गावापासून एक किमीवर तिला ठेवले होते. भाऊ तिला तेथे अन्नपाणी नेऊन देत होता.(केसीएन)मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तिचा मृत्यू झाला. अंत्यविधी कसे करणार म्हणून पातव्या दावर, मुकेश दावर व बिलसिंग दावर या तिघांनी गोधडीची झोळी बनवून मृतदेह फेकला.
सख्ख्या भावाने कुष्ठरोगी झालेल्या बहिणीवर अंत्यसंस्कार न करता मृतदेह जंगलात टाकून दिला. हाच मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील यावल पोलिसांना मिळाला. यावलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, हवालदार वासुदेव मराठे, पोलिस नाईक वसीम तडवी, यावल पालिकेचे जितू घारू यांनी माणुसकीचे दर्शन घडवत मृत महिलेवर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांना तिघांना ताब्यात घेतले आहे.