मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी दहावीची परिक्षा आजपासून सुरू होत आहे. मंगळवार 3 मार्चपासून राज्यात परीक्षेला सुरुवात होत आहे. या परीक्षेत 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी प्रविष्ट होतील. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या 65 हजार 85 ने वाढलेली आहे.
गेल्या वर्षी दहावीचा निकाल 70 टक्क्यांपर्यत घसरला होता. यामुळे यंदापासून पुन्हा अंतर्गत गुण सुरू करण्यात आले आहेत. 80 गुण लेखी परीक्षेसाठी असणार आहेत. तर 20 गुण अंतर्गत परीक्षेसाठी असतील. 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा असणार आहे. भाषा विषयाच्या पेपरपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे.
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 मुले व 7 लाख 89 हजार 894 मुली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जात आहे. राज्यामध्ये एकूण 4979 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. त्यापैकी 80 संवेदनशील केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आहे.