जळगावातील आयटीआय जवळची घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – अपघात झालेल्या पुतण्याला पाहण्यासाठी निघालेल्या काका – काकुच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातात काकू ठार झाली आहे, तर काका जखमी झाला आहे.
पुष्पा गुणवंत पाटील (६६, रा. प्रेमनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती गुणवंत पाटील (७०, रा. प्रेमनगर) हे जखमी झाले. हा अपघात शुक्रवार, ५ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ (आयटीआय) झाला. गुणवंत पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक असून ते पत्नी पुष्पा पाटील यांच्यासह प्रेमनगरमध्ये राहतात.
त्यांच्या पुतण्याचा अपघात झाल्याने त्याला पाहण्यासाठी हे पती-पत्नी कोल्हे नगरमध्ये जात होते. महामार्गावर आयटीआय जवळ आलेले असताना त्यांच्या दुचाकीला भरधावं अवजड वाहनाने धडक दिली. त्यात हे दाम्पत्य खाली पडले.
त्या वेळी त्यांना काही वाहनधारकांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तेथे गुणवंत पाटील यांना दाखल करून घेण्यात आले तर पुष्पा पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. मयत पुष्पा पाटील यांना एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई आहे. मुलगा मुंबई येथे नोकरीला आहे.