भुसावळ शहरातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीकडून म्हणजेच काकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीस अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडित मुलगी नाशिक येथील असून शिक्षण घेत आहे. तिच्या आई-वडिलांमध्ये कौटुंबिक वाद असल्याने ती आईसोबत राहत होती. आई नोकरी करत असल्यामुळे मुलगी नातेवाइकांकडे वेळोवेळी राहत असे. काही दिवसांसाठी ती भुसावळ येथील मावशीकडे राहण्यासाठी आली होती. मात्र, मावशी कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने मुलगी घरात काका आणि एका लहान भावासोबतच राहिली. या दरम्यान दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी काकाने अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केली. मुलीने विरोध केल्यावर तिला जीव घेण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याच रात्री काका पुन्हा घरी परतला व मध्यरात्री मुलीवर पुन्हा जबरदस्ती केली.
भीतीने गप्प राहिलेल्या मुलीने अखेर दि.१८ सप्टेंबर रोजी प्रकृती खालावल्यामुळे आई व मावशीला फोनवर संपूर्ण प्रकार सांगितला. १९ सप्टेंबर रोजी आई व मावशी परत आल्या. त्यांनी मुलीला सोबत घेऊन बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भुसावळ येथील संशयित आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार, धमकी यांसह कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.