जळगाव ;- अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघप्रणीत बहिणाई ब्रिगेड संघातर्फे शुक्रवारी बहिणाबाई चौधरी उद्यानात नागपंचमीनिमित्त महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते समाजातील १० कवींना कविरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा व माजी महापौर आशा कोल्हे, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, प्रदेश उपाध्यक्षा हर्षा बोरोले, जिल्हाध्यक्षा सुनीता येवले, महानगराध्यक्षा साधना लोखंडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी बहिणाबाई चौधरींच्या स्मृतींना उजाळा म्हणून काही कवींनी त्यांची गाणी सादर केली. महापौर जयश्री महाजन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि जळगाव यांच्यातील नाते उपस्थितांसमोर विषद केले. त्यानंतर तुषार वाघुळदे, के. के. भोळे, ए. के. नारखेडे, प्रा. डॉ. संध्या महाजन, सुनीता येवले, प्रा. डॉ. प्रकाश महाजन, मनीषा चौधरी, सविता भोळे, ज्योती राणे व शीतल पाटील यांना महापौर महाजन यांच्या हस्ते कविरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी नगरसेविका मीनाक्षी पाटील, रजनी महाजन, अंजली चौधरी उपस्थित होत्या.