लखनऊ ( प्रतिनिधी ) – कानपूरमधील एका पतीनं स्वतःच पत्नीच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी दिली.ज्यावर त्याची पत्नी लग्नाच्या आधीपासूनच प्रेम करत होती.
ही घटना हम दिल दे चुके सनम सिनेमाची आठवण करून देत आहे.उत्तर प्रदेशात राहणाऱ्या पंकजनं सहा महिन्यांपूर्वी कोमल नावाच्या मुलीसोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर लगेचच त्याच्या पत्नीने सांगितलं होतं, की तिचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे.
हे समजताच पतीने पत्नीला लग्नाच्या बंधनातून मोकळं केलं. त्यानं पत्नीला आधी घटस्फोट दिला आणि यानंतर स्वतःच आपल्या पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिलं. या घटनेबाबत बोलताना पत्नी कोमल म्हणते, की मी माझ्या पतीला लग्नानंतर काहीच दिवसात सांगितलं, की मी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते. तिच्या पतीनं म्हटलं, की तू जिथे खूश आहेस, ते ठीक आहे.
ज्या प्रियकरासोबत कोमलचं लग्न झालं तो सांगतो की त्यानं या लग्नाची स्वप्न बघणंच सोडून दिलं होतं. कोमलचं लग्न झाल्यापासून त्याला सर्वकाही संपल्यासारखं वाटत होतं. मात्र, आता आपलं प्रेम पुन्हा मिळाल्यानं तो आनंदात आहे. कजनं आपल्या पत्नीचं लग्न लावण्यासाठी सगळे नियम पाळले.
त्यानं आधी कोमलला घटस्फोट दिला. यानंतर सरकारी संस्था आशा ज्योती केंद्रात तिच्या लग्नासाठी सगळे कागदपत्र तयार केले. या लग्नाबाबत आशा ज्योती केंद्र अध्यक्ष संगिता यांनी सांगितलं, की जेव्हा कोमलचे पती आमच्याकडे आपल्या पत्नीचं लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन आले, तेव्हा हे ऐकून सुरुवातीला आम्हालाही विचित्र वाटलं. मात्र, मुलगी आणि सगळेच तयार असल्यानं आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं. लग्न करवून देणं आम्हाला भाग होतं, कारण नवरी या लग्नाला तयार होती.