पुणे (प्रतिनिधी) – मागील काही दिवसांपासून कात्रज चौकालगत असलेल्या पीएमपी बस स्थानकामुळे वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून कात्रज बसस्टॅंड हलविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या संदर्भातील कार्यवाही सुरू असून महापालिकेची कात्रज घाट पायथ्याला असलेल्या एक ते दीड एकरच्या जागेची मागणी पीएमपीने केली आहे. जागा ताब्यात घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर तत्काळ स्थानक हलविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.कात्रज चौकात चारही बाजूने मुख्य मार्ग येत असल्याने वाहनांची वर्दळ असते. त्यातच चौकालगत असलेल्या पीएमपीच्या स्थानकामुळे वाहतूक कोंडी होत असते. परिणामी, या ठिकाणी सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. यासंदर्भातील हे बसस्थानक हलविण्याची मागणी केली होती.