पुणे (वृत्तसंथा) – देशातील ट्रकचालकांना वर्षाला सर्वसाधारणपणे 48 हजार कोटी रुपयांची लाच मोजावी लागते, असे एका अभ्यास अहवालात आढळून आले आहे. ही लाच ट्रॅफिक, महामार्ग पोलीस त्याचबरोबर काही स्थानिक लोकांनाही द्यावी लागते.
सेव लाइफ फाउंडेशनने यासंदर्भात देशभरातील 10 मोठ्या वाहतूक केंद्रांवर अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. या स्वयंसेवी संस्थेने हा अहवाल विशेष म्हणजे रस्ते वाहतूक मंत्रालयाला सादर केला आहे. या अहवालातील माहितीनुसार, 67 टक्के ट्रक चालकांनी सांगितले की, त्यांना ट्रॅफिक किंवा महामार्ग पोलिसांना लाच द्यावी लागली. गुवाहाटी येथील वाहतूक केंद्र सर्वांत जास्त लाच घेणारे ठरले आहे. तेथे 97.5 टक्के ट्रकचालकांना लाच द्यावी लागली. त्यानंतर चेन्नई येथे 89 टक्के ट्रक चालकांना लाच द्यावी लागली तर, दिल्लीत हे प्रमाण 84.4 टक्के आहे. पुण्यासह देशातील इतर मोठ्या शहरातही कमी अधिक प्रमाणात हाच प्रकार चालू आहे.
शेवटच्या ट्रिपमध्ये लाच देण्याचे प्रमाण किती आहे असे विचारले असता 82 टक्के ट्रक चालकांनी सांगितले की, आम्हाला शेवटच्या प्रवासावेळीही कोणाला तरी लाच द्यावी लागली. याचा अर्थ लाच घेण्याचे प्रमाण सध्याही मोठ्या प्रमाणात आहे, असा समजला जातो. शहरांमध्ये स्थानिक पातळीवर पूजा समिती वगैरे असतात. त्यांच्या भागातून ट्रक जात असल्यास त्यांना पैसे द्यावे लागले असल्याचे 25 टक्के ट्रकचालकांनी सांगितले.
ट्रक चालकाना प्रत्येक ट्रीपला साधारणपणे 1,257 रुपये लाच द्यावी लागली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. परवान्याच्या नूतनीकरणासाठी लाच द्यावी लागते. मुंबईमध्ये 93 टक्के ट्रकचालकांना, गुवाहाटी येथे 83 टक्के तर, दिल्लीमध्ये 78 टक्के ट्रक चालकांनी सांगितले की, परवान्याच्या नूतनीकरणासाठी त्यांना लाच द्यावी लागली. परवान्याच्या नूतनीकरणासाठी सर्वसाधारणपणे 1,789 रुपयांची लाच द्यावी लागल्याचे आढळून आले आहे. तर वाहनाच्या नोंदणीसाठी सर्वसाधारणपणे 1,360 रुपयांची लाच द्यावी लागते, असे ट्रकचा ताफा बाळगणाऱ्यांनी सांगितले.