रावेर तालुक्यातील घटना
रावेर(प्रतिनिधी):-परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने जवळ धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी दि. १३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास रावेर-पुनखेडा रोडवरील रेल्वे पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली.

रावेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंगवर असताना, त्यांना पुनखेडा शिवारात एक तरुण संशयास्पदरित्या दुचाकीसह थांबलेला आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचा वाटणारा धारदार चाकू मिळून आला. सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तो हे शस्त्र बाळगून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण १ लाख ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र बाळू बग़ाडे (वय २५, रा. पुनखेडा, ता. रावेर, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत शिरीष (वय ३३) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी हे करत आहेत.









