जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात शनिवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. एकूण १६० टेबल्सवर जिल्हाभरात मोजणी होणार असून दुपारी १ वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे उपस्थित होते. सुरुवातीला मतदान प्रक्रियेत कर्तव्यावर असताना अपघातात निधन झालेले शिक्षक लक्ष्मीकांत पाटील आणि भडगाव येथे हृदयविकाराने निधन झालेले विजय भास्कर पाटील यांना आदरांजली वाहून त्यांच्या वारसांना १५ लाख रुपये दिले जातील अशी माहिती दिली. त्यानंतर जिल्ह्यात झालेल्या मतदानाविषयी सविस्तर आकडेवारीनुसार माहिती दिली. जिल्ह्यात ६५. ८० टक्के मतदान झालेले आहे. मतमोजणीला सर्वाधिक टेबल हे जळगाव शहरात २० असून चोपडा येथे १४, रावेर १४, भुसावळ १४, जळगाव ग्रामीण येथे १४, अमळनेर येथे १४, एरंडोल १४, चाळीसगाव १४, पाचोरा १४, जामनेर १४, मुक्ताईनगर १४ असे एकूण १६० टेबल लागणार आहेत. २१६ एवढे कर्मचारी मतमोजणीला लागतात. सकाळी साडे आठ वाजेपर्यंत पोस्टल मतदानाची नोंदणी होऊन त्याची माहिती ९ वाजेपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी सुरु होणार असून दुपारी १ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.