जळगाव शहरातील गोलाणी मार्केट जवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मायटी ब्रदर्स दुकानासमोर, गोलाणी मार्केट परिसरात प्रेमप्रकरणाच्या संशयावरून १८ वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.


खून झालेल्या तरुणाचे नाव जय उर्फ साई गणेश गोराडे (वय १८, रा. काशीबाई शाळेमागे, दशरथनगर, जळगाव) असे आहे. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटजवळील मायटी ब्रदर्स दुकानासमोर ही घटना घडली. मयताचे काका दिपक सोनू गोराडे (पाटील) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझा पुतण्या मयत जय उर्फ साईच्या वर्गात शिकणारी एका मुलीसोबत प्रेम प्रकरण आहे. या कारणाच्या संशयावरून आरोपी शुभम सोनवणे याच्याशी वाद झाला या वादातून शुभम ने जय उर्फ साईवर चाकूने उजव्या व डाव्या बाजूस गंभीर वार केले. या हल्ल्यात जय गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शुभम सोनवणे याला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पी.आय . सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक खेडकर सह पोलीस करीत आहेत. शहरात घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.







