आयजी प्रताप दिघावकर यांची जळगावात पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – सीमेवरील बॉर्डर बैठका पुन्हा सुरू केल्या जाणार असून संयुक्त नाकाबंदी करणे आणि गुन्हेगारांची कार्यप्रणालीची माहिती आदानप्रदान केली जाणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) प्रताप दिघावकर यांनी जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात,प्रेरणा हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी 30 रोजी ते बोलत होते.
आयजी दिघावकर यांनी जिल्ह्यात गुन्हेगारीचा आढावा घेतला. नवरात्रोत्सव, ईद सणाच्या पार्श्वभूमीवर विविध सूचना केल्या. पोलीस व जनतेचे संबंध कसे आहेत याची माहिती घेतली. यापुढे शहर, भुसावळ, चाळीसगाव अशी विभागणी केलेली आहे. त्यानुसार उघडकीस न आलेले, महामार्गावरील गुन्हेगारी, दरोड्याचे गुन्हे यावर वर्गवारी केली आहे. दरोड्याचे गुन्हे हे हेवेदाव्यातूनच केले जातात., जिल्ह्यात किती टोळ्यांवर मोका, एमपीडिए, तडीपार कारवाई करता येईल याचा आढावा घेत आहे., जिल्ह्यात गुन्हेगारी दत्तक योजना राबविली जाणार आहे. प्रत्येक 15 दिवसात गुन्हेगाराच्या घरी जाऊन त्याची भेट घ्यावी, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे सूचित केल्याचे त्यांनी सांगितले.
कापूस, केळी उत्पादक शेतकरी आणि बेरोजगार युवकांची फसवणूक करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे., जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा राखायला प्रभावी कार्यवाही केली जाणार आहे. जिल्ह्यात गुन्हे नियंत्रण चांगले असून करोनाच्या काळात गुन्हेगारी काहीशी थांबली. याबाबत जळगावकरांना धन्यवाद देऊ इच्छितो.सहा महिन्यांत सण उत्सवात सोशल डिस्टनसिंगचे पालन चांगले झाले. शिस्तीचे दर्शन घडले. यामुळे हा जळगाव पॅटर्न ओळखला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बॉर्डर बैठकांच्या माध्यमातून सीमेवरून होणारी गांजा, ड्रग्स, बंदुका, दरोडा, जबरी चोरी थांबवली जाणार आहे. यासाठी धुळे, जळगाव, खरगोन, बऱ्हाणपूरच्या अधीक्षकांची बैठक बोलावली जाणार आहे.
नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी माझ्या 9773149999 या वैयक्तिक क्रमांकावर संपर्क करावा . कुठलीही वेळ न घेता मला थेट ऑफिसमध्ये भेटायला यावे, असे सांगत त्यांनी जिल्हा गुटखामुक्त करण्याचा मानस असून त्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. शाळा, महाविद्यालयात सर्रास गुटखा विकला जातो, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. वाळूतस्करीसाठी तक्रार करावी व महिला अत्याचार रोखण्यासाठी डॉक्टर, प्राध्यापक, वकील यांची विशेष समिती गठीत करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी आयजी दिघावकर हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, दोन्ही अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, भाग्यश्री नवटके उपस्थित होते.