‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ उपक्रम ग्रामीण-आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा नवा दालन

प्रत्यक्ष प्रयोगांतून विज्ञान समजून घेण्याची अनोखी संधी
जळगाव (प्रतिनिधी) राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव केंद्रामार्फत ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यास हा उपक्रम मोलाचा ठरत आहे. प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. माननीय कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी तसेच माननीय प्र-कुलगुरू प्रा. सोपान टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेमार्फत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देण्यात येत आहेत. या प्रदर्शनामध्ये भौतिकशास्त्र, जीवनशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, सूक्ष्मजैवशास्त्र तसेच गणित या विषयांतील एकूण ३० शैक्षणिक प्रयोगांचा समावेश करण्यात आला आहे. मानवी शरीराचा टॉर्सो मॉडेल, सूक्ष्मदर्शक प्रयोग, प्रतिकार मोजणी उपकरणे, चुंबकत्व, न्यूटनचे क्रेडल, विद्युतचुंबकीय प्रेरण यांसारख्या प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान प्रत्यक्ष अनुभवता येत आहे.
दि. ८ जानेवारी २०२६ रोजी मिल्लत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मेहरूण (जळगाव) येथे या फिरत्या प्रयोगशाळेने भेट दिली. या वेळी अब्दुल अहमद (टीम लीडर), कल्याणी शिरसागर, मयुरी गिरासे, आकाश वाणी व राखी शिरसाठ यांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ७७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यानंतर दि. १० जानेवारी २०२६ रोजी जे. ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे सौ. वृंदा पाटील, सौ. अस्मिता पाटील, श्री. राहुल व्ही. हजारी, रोहित भोई व पराग जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला, यामध्ये १३५ विद्यार्थी सहभागी झाले. तसेच कै. गणपतराव खडसे आश्रम शाळा, कोठली (मुक्ताईनगर) येथे ११० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे विज्ञान समजून घेण्याची संधी मिळत असून, भविष्यातील संशोधक, अभियंते व शास्त्रज्ञ घडविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. सर्व ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक व शाळा प्रशासनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रयोग करताना विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता, तर शिक्षकांनी या उपक्रमामुळे विज्ञान विषय अधिक रंजक व समजण्यास सोपा होत असल्याची भावना व्यक्त केली.
भविष्यातही अशा प्रकारचे विज्ञानविषयक उपक्रम अधिकाधिक शाळांमध्ये राबवावेत, असे आवाहन या उपक्रमाचे समन्वयक प्रा. संजय एस. घोष यांनी केले आहे.








