जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळ रेल्वे स्थानकावर प्लॅट क्रमांक सहावर गोवा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्या प्रवाशाला धमकावत चौघांनी 34 हजारांची रोकड 1 नोव्हेंबररोजी हिसकावली होती. यापैकी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना रेल्वे न्यायालयाने 9 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे .
तक्रारदार महेंद्र जैतराम गौतम (18) हे 1 नोव्हेंबररोजी ट्रेन क्रमांक 02779 डाऊन गोवा एक्स्प्रेसच्या इंजिन जवळच्या जनरल डब्यातून प्रवास करीत असताना भुसावळ स्थानकात प्लॅटफार्म क्रमांक सहावर गाडी उभी असताना चौघांनी गौतम यांच्या खिशातील पाकिटातून 34 हजारांची रोकड लांबवली होती. आबीद शहा फकीर शब्बीर शहा (28) व रईस अहमद नबी अहमद (35, भुसावळ) यांना 3 नोव्हेंबररोजी अटक करण्यात आल्यानंतर 28 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली या गुन्ह्यात पसार असलेल्या नईम शहा उर्फ भुर्या रज्जाक शहा (30) व शाहरुख खान उर्फ भांजा इकबाल खान (23, दोन्ही रा.ग्रीन पार्क, भुसावळ) यांना सोमवारी अटक करण्यात आली.
ही कारवाई औरंगाबाद लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्गचे पो नि विजय घेर्डे, एएसआय भरत शिरसाठ, हवालदार दिवाणसिंग राजपूत, सागर खंडारे व आरपीएफ पथकाने केली. तपास पोउनि संजय साळुंखे हे करीत आहेत.