रावेर तालुक्यातील वादळी गारपीटात ४५१ हेक्टरवरील पिकांची हानी
जिल्हाधिकाऱ्यांना ६४९ शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल सादर
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यात शनिवारी दि. १२ रोजी दुपारी चारच्या सुमारास आलेल्या वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीत तब्बल ४५१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ६४९ शेतकरी बाधित झाले आहेत. याचा प्राथमिक अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
सर्वाधिक नुकसान रावेर गावात झाले असून तेथे २८० हेक्टर क्षेत्रातील ३९५ शेतकरी बाधित झाले आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून प्रशासनाकडून मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील मदतीसाठी अंतिम अहवालावर निर्णय घेतला जाणार असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले आहे.