नगराध्यक्ष साधना महाजन यांनी केला सत्कार
जामनेर (प्रतिनिधी) : येथील एकलव्य प्राथमिक विद्यालयाचे उपशिक्षक निलेश हरी पाटील यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील डॉक्टर होण्यासाठी नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. जामनेर तालुक्यात तो प्रथम आला असून नगराध्यक्षा साधना महाजन यांनी त्याचा सत्कार करून कौतुक केले आहे.
प्रथमेश पाटील यांनी प्राथमिक शिक्षण एकलव्य विद्यालयात घेऊन ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर येथे १२वी विज्ञान शाखेत प्रथम आले. स्वतः डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व मेहनत करून कोणताही क्लास न लावता नीट परीक्षेत एकूण ७२० पैकी ६७५ गुण मिळवत जामनेर तालुक्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे. त्याबद्दल ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या सचिव तथा नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते प्रथमेश पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पेढे देऊन स्वागत केले. त्यावेळी माजी नगरसेवक दिपक तायडे, नगरसेवक आतिष झाल्टे (जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक), रविंद्र झाल्टे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, निलेश पाटील, विलास पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.