अमळनेर येथे सरपंच, ग्रामसेवकांच्या मार्गदर्शन मेळाव्यात सीईओ करणवाल यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) :- प्रशासकीय काम हा आपल्या नोकरीचा भाग असला तरी ते काम कर्तव्य समजून आपल्याला करावेच लागत असते. मात्र प्रशासकीय कामाव्यतिरिक्त पाणी आडवा, पाणी जिरवा तसेच आपल्या गावाला स्वच्छतेशी संबंधित उपक्रम राबवून आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

मंगळवार दि. ६ मे रोजी अमळनेर दौऱ्यावर असताना अमळनेर येथील गंगाराम सखाराम हायस्कुल येथे आयोजित करण्यात आलेल्या सरपंच व ग्रामसेवकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होत्या. या वेळी त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी एन. आर. पाटील उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल या मंगळवार दि. ६ मे रोजी अमळनेर तालुक्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. या वेळी करनवाल यांनी अमळनेर तालुक्यातील म्हसले येथे भेट देऊन तेथील घरकुल बांधकामाच्या कामांची पाहणी केली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी आवास ऍपच्या माध्यमातून घरकुलाबाबतचे सर्व्हेक्षण स्वत केले.
त्यासोबतच अमळनेर तालुक्यातील टाकरखेडे गावाला देखील भेट देऊन तेथे सुरु असलेल्या घरकुल कामांचा आढावा घेतला. तसेच गावात शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या विविध योजनांचा आढावा जाणून घेऊन सुरु असलेलं घरकुलांचे बांधकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देखील मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी या वेळी दिल्या. अमळनेर तालुक्यातील आय एस ओ नामांकन प्राप्त ग्रामपंचायतीस भेट देऊन पाहणी केली.
तसेच वृक्षारोपन देखील श्रीमती करनवाल यांचे हस्ते करण्यात आले. अमळनेर येथील गंगाराम सखाराम हायस्कुल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सभेस देखील त्यांनी उपस्थिती लावत जलतारा तसेच मिशन संजीवनी बाबत उपस्थित ग्रामसेवक, सरपंच यांना विस्तृत मार्गदर्शन केले. या वेळी गावागावातील पाणी टंचाईची परिस्थिती बघता पाणी आडवा पाणी जिरवा सारखे उपक्रम आपण स्व प्रेरणेने घेतले पाहिजे व त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून काम केले पाहिजे असे आवाहनही करनवाल यांनी केले.