अमळनेर येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- संशयित ५ जणांनी लोखंडी हत्याराने तिघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करत जखमी केल्याची घटना शनिवारी दि. १७ रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. याबाबत अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील स्टेशन रोडवर लहान मुलांच्या भांडणावरून हि घटना घडली. मोहन सातपुते यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दि. १७ रोजी सायंकाळी ७ वाजता मुलांच्या भांडणावरून वाद झाला होता. त्यात समझोता करून वाद मिटवला होता. मात्र रात्री नऊच्या सुमारास स्टेशन रोडवर अनिल सातपुते, मुलगा पंकज सातपुते, पुतण्या कल्पेश सातपुते व चुलत पुतण्या दीपक चौगुले आदी गप्पा मारीत बसलेले असताना चार, पाच जण हातात लोखंडी हत्यार घेऊन भाऊ व पुतण्यास शिवीगाळ करीत तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत हल्ला केला. संशयित योगेश राजपूत याने हातातील गुप्तीने कल्पेश सातपुते यास पोटावर वार केले.
संशयित सुमीत राजपूत याने हातातील चाकूने पंकज सातपुते याच्या मानेवर व उजव्या हातावर चाकूने वार केले. संशयित मुकेश परदेशी याने फायटरने अनिल सातपुते याच्या डोक्यावर वार केला तर संशयित राजेश परदेशी याने लोखंडी सळईने हातापायावर वार करून जखमी केल्याची घटना घडली. याबाबत अमळनेर पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख तपास करीत आहेत.