जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केला ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘लखपती दीदी’च्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी शनिवारी दिनांक १७ ऑगस्ट रोजी कार्यक्रमस्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे हेदेखील दाखल झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षाव्यवस्थेसाठी नियोजन करण्यात व्यस्त झाले आहेत.
एकनाथ डवले शनिवारी सकाळी जळगावात दाखल झाले. त्यानंतर सकाळ सत्रात त्यांनी विमानतळासमोरील जागेची पाहणी केली. या परिसरातील कार्यक्रमस्थळ आणि वाहनतळ याची माहिती जाणून घेतली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प.चे सीईओ अंकित, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेल्या पंतप्रधानांच्या ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रमाचा आराखडा सादर केला.
विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे व पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधानांच्या दौऱ्याविषयी चर्चा झाली. शहरासह छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर वाहतुकीच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांसाठी एक आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जामनेर मार्गावरची वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सोमवारी यासंदर्भात अंतिम आराखडा तयार केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी आराखड्यात मूळ कार्यक्रमानिमित्ताने कराव्या लागणाऱ्या सुविधा, वाहनतळ, लाभार्थीसाठी नाश्ता व भोजन, प्रवासासह अन्य बाबींचा समावेश आहे. जि.प.चे सीईओ अंकित यांनी ग्रामीण लाभार्थीसंदर्भात माहिती सादर केली.