जळगाव ( प्रतिनिधी ) – खोटेनगर भागातील सुरक्षानगरातील रहिवाशी रवींद्र पुंडलिक बागुल (वय ५०) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. बागुल यांनी आत्महत्या का केली याचे कारण लगेच समजू शकले नाही .
रवींद्र बागुल एका बँकेत नोकरीला होते ते सुरक्षानगरात पत्नी वंदना, मुलगा ज्ञानेश्वर व मुलगी आरती यांच्यासह वास्तव्याला होते. घराच्या वरच्या मजल्यावर रवींद्र बागुल तर तळ मजल्यावर त्यांचे भाऊ राजेंद्र बागुल वास्तव्याला आहेत. रवींद्र बागुल यांनी सकाळी सहा वाजता गळफास घेतल्याचे दिसून आले. हे लक्षात आल्यानंतर पत्नी व मुलांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.
रवींद्र बागुल यांनी आत्महत्या केली असली तरी त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली नाही. मुलगा ज्ञानेश्वर मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार अनिल फेगडे, दिनेश पाटील यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बागुल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. एक भाऊ पोलीस दलात आहे. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.