महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ मधील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीच्या (भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई) अधिकृत उमेदवारांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या बंडखोरांना पक्षाने कडक इशारा दिला असून, मतदारांनी केवळ अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

प्रभाग १३ मधील महायुतीचे अधिकृत ‘रथी-महारथी’
महायुतीने प्रभाग १३ मधील चारही जागांसाठी आपली ताकद पणाला लावली आहे. अधिकृत उमेदवारांमध्ये १३-अ (भाजपा): नितीन प्रभाकर सपके (चिन्ह: कमळ), १३-ब (भाजपा): सौ. सुरेखा नितीन तायडे (चिन्ह: कमळ), १३-क (भाजपा): सौ. वैशाली अमित पाटील (बिनविरोध निवड), १३-ड (राष्ट्रवादी काँग्रेस): प्रफुल्ल गुलाबराव देवकर (चिन्ह: घड्याळ) यांचा समावेश आहे.
बंडखोरांवर कारवाईचा बडगा
भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुक होते. मात्र, पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतरही काही इच्छुकांनी माघार न घेता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, हे बंडखोर उमेदवार स्वतःला ‘भाजपाचेच’ असल्याचे भासवून मतदारांची दिशाभूल करत असल्याचे महायुतीच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने स्पष्ट केले आहे की, “येत्या दोन दिवसांत बंडखोर उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट करून माघार न घेतल्यास, त्यांच्यावर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.”
शहराच्या आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार कटिबद्ध आहेत. “मतदारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा अपक्ष उमेदवारांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. कमळ आणि घड्याळ या अधिकृत चिन्हांवरच आपले बहुमोल मत देऊन महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे,” अशी नम्र विनंती महायुतीतर्फे दीपक सूर्यवंशी यांच्यातर्फे करण्यात आली आहे.









