जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पिंप्राळा हुडको परिसरात बुधवारी २० फेब्रुवारी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पथकावर जमावाने हल्ला चढवला. ज्यात दोन महिला पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या. एका महिला पोलिसाच्या गळ्यातील मंगळसूत्रही या झटापटीत तुटून हरवले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका गुन्ह्यातील संशयितांना पकडण्यासाठी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पथक पिंप्राळा हुडको परिसरात गेले होते. गेल्या महिन्यात प्रेमविवाहानंतर झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर काही संशयित अजून फरार आहेत. याच संशयितांना पकडण्यासाठी पोलीस पथक गेले होते. पोलिसांचे पथक पिंप्राळा हुडकोत पोहोचताच जमावाने त्यांना घेरले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली.
जमावाचा आक्रमक पवित्रा पाहून महिला पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु जमाव अधिकच हिंसक झाला. जमावाने महिला पोलिसांचे केस ओढून त्यांना खाली पाडले आणि मारहाण केली.या झटापटीत स्वाती पाटील नावाच्या महिला पोलिसांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून हरवले, तर शिला गांगुर्डे या महिला पोलिसांना जमावातील एका व्यक्तीने कडाडून चावा घेतला, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दोन्ही जखमी महिला पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरा पर्यंत रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.