बुलढाणा ( प्रतिनिधी ) – जळगाव जामोद तालुक्यात दोन पोलिसांनी एका महिलेसोबत जबरदस्तीने अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या तक्रारीवरुन दोघा पोलिसांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी फरार झाले आहेत.
जळगाव जामोद पोलिस स्टेशन अंतर्गत जामोद गावात पीडित महिला पती आणि मुलीसह राहते. महिलेचा पती 25 नोव्हेंबररोजी कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. महिलेचा पती घरी नसल्याची संधी साधत हे दोन्ही पोलीस रात्री महिलेच्या घरात घुसले. त्यांनी महिलेशी अश्लील संभाषण करुन शरीर सुखाची मागणी केली. महिला आणि पोलिसात सुरु असलेले संभाषण ऐकून शेजारच्या खोलीत झोपलेली महिलेची मुलगी जागी झाली. मुलीने मदतीसाठी जोरजोरात आरडाओरडा सुरु केला. मुलीचा आरडाओरडा पाहून या पोलिसांनी तिथून पळ काढला.
श्रीकृष्ण संदुके आणि दाते मेजर अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून ते जामोद पोलीस चौकीत हेड कॉन्स्टेबल आहेत. महिलेच्या मुलीने आरडाओरडा केल्याने पोलिसांनी घरातून पळ काढला. मात्र त्यानंतर महिलेच्या मोबाईलवर अनेक वेळा फोन करुन पुन्हा शारीरिक सुखाची मागणी करीत होते. अखेर महिलेने कंटाळून पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. तक्रारीच्या पडताळणीनंतर या दोघांविरुद्ध कलम 354, 354 अ, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही सध्या फरार आहेत.