जळगाव (प्रतिनिधी) – येथील नशिराबाद पोलीस स्टेशन येथे नोकरीस असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश रमेश पाटील (वय 43) यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच मागितली. म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सतीश पाटील यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे.
येथील नशिराबाद पोलीस स्टेशनला तक्रारदार यांच्याविरुद्ध अर्ज आला होता. त्यामुळे तक्रारदार विरुद्ध गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश रमेश पाटील (वय 43) रा.पिंप्राळा शिवार, जळगाव यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. गुरुवारी आठ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाराकडून पाच हजार रुपये लाच घेताना सतीश पाटील यांना रंगेहात पकडले. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये अधीक्षक गोपाल ठाकुर, संजोग बच्छाव, रवींद्र माळी, ईश्वर धनगर, सुनील पाटील, सुरेश पाटील, सुनील शिरसाठ, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख यांनी कारवाई केली.