जळगावात जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील प्रकार
जळगाव ( प्रतिनिधी ) – दरवाजात बसून रेल्वेच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोबाईल पाडणाऱ्या चोरट्याला एलसीबीने गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्याला कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतू पोलीसांकडून चौकशी सुरु असतांना कारवाईपुर्वीच पोलिसांच्या हातावर तूरी देवून चंद्रकांत दिलीप पाटील (रा. नंदुरबार) हा चोरटा पोलीस ठाण्यातून पसार झाला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांना समजताच पोलिसांनी पाठलाग करीत संशयिताला ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती.
शहरातील प्रेमनगराजवळ धावत्या रेल्वेच्या दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशाचा हाताला झटका मारुन संशयित चंद्रकांत पाटील याने मोबाईल पाडला. प्रवाशाने गाडी हळू झाल्यानंतर त्याने रेल्वेतून खाली उतरून चोरट्याचा पाठलाग सुरु केला. चोरटा पळून जात असतांना नागरिकांनी त्याला पकडून ठेवले. हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांना समजाच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवून संशयित चोरट्याला ताब्यात घेतले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाईसाठी मोबाईल चोरट्याासह तक्रारदाराला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आणि एलसीबीचे कर्मचारी तेथून निघून गेले.
पोलीस तक्रारदाराची तक्रार ऐकून घेत असल्याचा फायदा घेत संशयित मोबाईल चोरटा चंद्रकांत पाटील हा पोलीस ठाण्यातून पसार झाला. ही बाब तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी पळून गेलेल्या संशयित चोरट्याचा शोध सुरु केला. पोलीस ठाण्यातून मोबाईल चोरटा पळून गेल्याने पोलीसांमध्ये गोंधळ उडाला. जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी संशयित चोरट्याचा शोधार्थ रवाना झाले. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक गल्लीत पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात होता.
पळून गेलेला चोरटा हा महाराणा प्रताप पुतळ्याजवळील बंद पडलेल्या पेट्रोलपंपाजवळील झाडाझुडपात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोधमोहीम राबवित संशयित मोबाईल चोरटा चंद्रकांत पाटील याला उचलून आणत त्याला पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.