जळगावात जुन्या वादातून दोन गट भिडले
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात राजकीय वादातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेचे टेंडर मिळवण्याच्या कारणावरून भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि अपक्ष उमेदवाराचे पती राहुल ठाकरे यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. धक्कादायक बाब म्हणजे, वाल्मीक नगरमध्ये सुरू झालेला हा वाद थेट शनिपेठ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आणि तिथेच माजी नगरसेवक सोनवणे यांना मारहाण करण्यात आली.
जळगाव महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेवरून वाल्मीक नगर भागात भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. या घटनेची तक्रार देण्यासाठी कैलास सोनवणे हे शनिपेठ पोलीस ठाण्यात आले असता, त्या ठिकाणी राहुल ठाकरे याने पुन्हा त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात सोनवणे यांच्यासह दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचेही समोर येत आहे. महापालिका निवडणुकीत कैलास सोनवणे यांच्या कन्या प्रतीक्षा सोनवणे यांच्या विरोधात राहुल ठाकरे यांच्या पत्नी चैताली ठाकरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत प्रतीक्षा सोनवणे यांचा विजय झाला होता. तेव्हापासून असलेल्या राजकीय वैमनस्यातून आणि आता टेंडरच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्वतः शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. पोलीस ठाण्यातच हाणामारी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून शहर आणि पोलीस ठाणे परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जखमी कैलास सोनवणे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर दोन जणांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
“महापालिकेचे टेंडर मिळवण्यावरून दोन गटात वाद होऊन हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची दखल घेण्यात आली असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.”
— डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव.









