जळगाव जिल्हा होमगार्डचा ७९ वा वर्धापन दिन सप्ताह उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र होमगार्ड संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्ह्यात ७ ते १३ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला ७९ वा ‘होमगार्ड वर्धापन दिन सप्ताह’ विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. या सप्ताहाचा शानदार समारोप शुक्रवारी दि. २६ डिसेंबर रोजी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर आयोजित भव्य संचलन परेडने करण्यात आला. जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या परेडची मानवंदना स्वीकारली.

वर्धापन दिन सप्ताहाचे औचित्य साधून जिल्हाभरात तालुकास्तरावर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शासकीय रुग्णालयांमध्ये फळवाटप, गरजूंना कांबळेवाटप, रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिरे असे विविध उपक्रम राबवण्यात आले. जळगाव शहरातील शाळांमध्ये ‘अग्निशमन व विमोचन’ प्रात्यक्षिकांद्वारे आपत्ती व्यवस्थापनाची जनजागृती करण्यात आली. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक अशोक नखाते यांच्या अध्यक्षतेखाली विविध तालुक्यांत तिमाही संमेलने घेऊन जवानांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
समारोप प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, “होमगार्डने समाजासाठी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात लवकरच सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील आहे.” पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी होमगार्ड हा पोलीस दलाचा अविभाज्य घटक असल्याचे सांगत, प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले. आगामी पोलीस भरतीमध्ये होमगार्ड जवानांनी जास्तीत जास्त यश मिळवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दिमाखदार परेडमध्ये होमगार्ड आणि पोलीस विभागाचे प्रत्येकी तीन असे एकूण सहा प्लाटून सहभागी झाले होते.
परेड कमांडर रवींद्र ठाकूर (वरिष्ठ पलटन नायक, जळगाव), सहाय्यक परेड कमांडर विजय जावरे (वरिष्ठ पलटन नायक, यावल), पोलीस विभागाचे नेतृत्व देविदास वाघ, मंसूरी व शांताराम देशमुख यांनी केले, तर होमगार्ड प्लाटूनचे नेतृत्व अनिल पाटील, भिला चव्हाण, मंगला वाणी, सविता पाचपांडे, भावेश कोठावदे व तुषार नेवे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक नखाते यांनी केले, तर सूत्रसंचालन मदन रावते यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, समादेशक अधिकारी संजय पाटील यांच्यासह विविध तालुक्यांतील पथक अधिकारी व मोठ्या संख्येने होमगार्ड जवान उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कडू सपकाळे, सचिन वाघ, नितीन भावसार, मधुकर मोरे आणि जळगाव पथकातील जवानांनी विशेष परिश्रम घेतले.









