जळगाव पोलीस भरतीमध्ये ५०० पैकी १२० उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची माहिती
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेला आज, ११ फेब्रुवारी २०२६ पासून पोलीस मुख्यालय येथे अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरणात सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.


भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकूण ५०० उमेदवारांना शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यापैकी ३४० उमेदवार प्रत्यक्ष मैदानावर हजर झाले. या चाचण्यांदरम्यान ४१ उमेदवार शारीरिक मोजमापात अपात्र ठरले, तर १७९ उमेदवारांना मैदानी चाचणीत यश मिळवता आले नाही. दिवसभराच्या प्रक्रियेअंती विहित निकषांनुसार १२० उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत.
सदरची संपूर्ण भरती प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असून, त्यात मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सर्व चाचण्या पार पडत आहेत. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उमेदवार आणि पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही समाजकंटक किंवा दलाल भरतीत निवड करून देण्याचे खोटे आमिष दाखवून पैशांची मागणी करण्याची शक्यता असते.
उमेदवारांनी अशा कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये. पोलीस भरतीसाठी कोणालाही पैसे देणे किंवा घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे. जर कोणाकडे अशा प्रकारची मागणी केली गेली, तर त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही भरती प्रक्रिया केवळ कष्टाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर पार पडणार असल्याने, उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.










