जळगाव (प्रतिनिधी) : शहरात जिल्हा पोलीस दलातर्फे बुधवार दि. १९ जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु होत आहे. या प्रक्रियेसाठी पोलीस दलाची तयारी पूर्ण झाली असून एकूण २ हजारांच्या वर उमेदवारांची पोलीस भरती चाचणी घेतली जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.
डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी दि. १५ जून रोजी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा पोलीस दल पोलीस ग्राउंडवर पोलीस भरती प्रक्रिया घेणार आहे. दि. १९ पासून हि प्रक्रिया सुरु होईल. पहिल्या दिवशी ५०० तर दुसऱ्या दिवशीपासून १ हजार मुलांची परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक संबंधितांना देण्यात आले असून उमेदवारांना मोबाईलवर कळविण्यात आले आहे. त्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र देण्यात आले आहे.
भरतीच्या दिवशी दि. १९ जूनला पहाटे ४.३० वाजता उमेदवारांना प्रवेश देऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना शारीरिक पात्रता चाचणीला सामोरे जायचे आहे. नंतर धावण्याच्या स्पर्धा व गोळाफेक घेऊन त्यांची पात्रता तपासली जाणार आहे. भरती प्रक्रिया आटोपली नंतर पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेसाठी ६ हजार ५५७ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. तर प्रक्रियेसाठी ३५० कॉन्स्टेबल, १५ पोलीस उपनिरीक्षक, १० निरीक्षक, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षक व दोन्ही अप्पर पोलीस अधीक्षक परिश्रम घेणार आहेत.