जळगाव (प्रतिनिधी):- शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मुख्य रस्त्यांवर आणि वाईन शॉप्सच्या परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करून धुडगूस घालणाऱ्या तळीरामांना जळगाव पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. विशेष म्हणजे, या धडक मोहिमेचे नेतृत्व स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले. एसपी स्वतः अचानक रस्त्यावर उतरल्याने मद्यपींची एकच पळापळ उडाली.

वाढत्या तक्रारींनंतर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’
शहरातील विविध वाईन शॉप्स, बिअर शॉपी आणि रस्त्यांच्या कडेला उघड्यावर मद्यप्राशन केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वाढल्या होत्या. यामुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी मद्यपींकडून गोंधळ आणि शिवीगाळ होत असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली.
वाईन शॉप्सबाहेर अचानक छापेमारी
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः पथकासह शहरात गस्त घालत विविध भागांत अचानक छापेमारी केली. वाईन शॉप्सच्या आडोशाला बसून बेकायदेशीरपणे दारू पिणाऱ्यांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. पोलिसांचा हा खाकीचा हिसका पाहून नेहमी रस्त्याच्या कडेला पार्ट्या करणाऱ्या तळीरामांची चांगलीच तारांबळ उडाली आणि अनेकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.
वाईन शॉप चालकांचेही धाबे दणाणले
या मोहिमेमुळे केवळ तळीरामच नव्हे, तर सार्वजनिक नियम धाब्यावर बसवून मद्यपींना आडोसा उपलब्ध करून देणाऱ्या काही वाईन शॉप चालकांचेही धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी संबंधित ठिकाणांची पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
पोलिसांच्या या तडकाफडकी कारवाईनंतर जळगावच्या नागरिकांनी, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. पोलिसांच्या या ‘ॲक्शन मोड’चे सर्वत्र कौतुक होत असून अशा कारवाया नियमित करण्याची मागणी नागरिक करत आहेत.









