पोलिसांमधील वाद थांबवण्याची पोलीस अधीक्षकांसमोर वेगळीच डोकेदुखी !
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात गुन्ह्यांची वाढती आकडेवारी पोलिसांना डोकेदुखी ठरत आहे. आता तर चक्क पोलिसांमध्येच वाद होत असून रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिकाऱ्यांमध्ये शनिवारी चांगलीच जुंपली होती. यात पोलिस नाईकने पाण्याची बाटली फेकून दुखापत केल्याची फिर्याद चक्क पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याने दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांमधील वाद शमविण्याची डोकेदुखी पोलिस अधीक्षकांसमोर निर्माण झाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक गोपाल कडुबा देशमुख (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, विशाल राजेंद्र चोपडा यांनी दिलेल्या तक्रारीत संशयित म्हणून नूर मोहम्मद अब्दुल गफूर हे आहेत. यातील विशाल चोपडा यांचा स्थानिक तक्रार अर्ज पीएसआय देशमुख यांच्याकडे आहे. तर याच अर्जदाराचा वरिष्ठ अर्ज पोलीस नाईक अनमोल सत्तार पटेल यांच्याकडे आहे. या प्रकरणातील संशयित नूर मोहम्मद अब्दुल गफूर याची आलेल्या तक्रारीसंबंधित पीएसआय देशमुख हे चौकशी करीत आहेत. त्यांनी चौकशीकामी नूर मोहम्मद यांना बोलावले मात्र त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
याबाबत पीएसआय देशमुख यांनी नूर मोहम्मद यास विचारले असता त्यांनी, पोलीस नाईक अनमोल पटेल यांनी देशमुख यांच्याकडे चौकशीसाठी जाऊ नका असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शनिवारी १८ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या दालनात शासकीय कामासाठी पीएसआय देशमुख गेले होते.
त्यावेळी संशयित नूर मोहम्मद तिथे बसलेला होता. काही वेळेत पोलीस नाईक अनमोल पटेल हेदेखील साध्या वेशात तेथे आले. यावेळी सदर अर्जाची चौकशी पोलीस निरीक्षक यांनी सुरू केली. यावेळी पोलीस नाईक पाटील यांनी नूर मोहम्मद यांना विचारले की, देशमुख साहेब काय बोलले ते सांगा. नूर मोहम्मद यांनी सांगितले की, तुम्ही दोघे एकाच जातीचे असून एकमेकांना मदत करत आहात. असे सांगताच अनमोल पटेल याने पोलीस निरीक्षकांच्या टेबलावरील पाण्याची बाटली घेऊन पीएसआय देशमुख यांना शिवीगाळ करीत अंगावर येत पाण्याची बाटली फेकून मारली.
देशमुख यांनी डाव्या हाताने अडवली. डाव्या हाताला मुक्का मार लागून हातातील घड्याळ तुटुन खाली पडले व मुका मार लागला. पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी गोंधळ ऐकून धावत आले. त्यावेळी त्यांनी अनमोल पटेलपासून देशमुख यांची सुटका केली. यानुसार पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस नाईक अनमोल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.