पुणे ( वृत्तसंस्था) – पीएमआरडीए नियोजन समिती निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला पुणे मनपातील हक्काची 10 मतं देखील मिळवता आलेली नाही.
या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंदू कदम यांचा पराभव झालाय तर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपआपले सर्व उमेदवार निवडून आणले आहेत. पुणे मनपा हद्दीत भाजप 14, राष्ट्रवादी 7 तर शिवसेनेचा 1 सदस्य पीएमआरडीए नियोजन समितीवर निवडून गेला आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाने या निकालावरून तरी काहीतरी धडा घ्यावा, असा चिमटा राष्ट्रवादीने काढला आहे. या निवडणुकीत विश्वजित कदम यांचा चुलत भाऊ काँग्रेस उमेदवार चंद्रकांत कदम यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे काँग्रेससोबतच राज्यमंत्री विश्वजित कदम यांना हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे तीन तर भाजपचे 9 मतं फुटल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपने 22 पैकी 14 जागांवर विजय मिळविला. भाजपने उभे केलेले सर्व उमेदवार विजयी झाले. यामुळे आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी सरकारला हा एक मोठा धक्का बसल्यातं बोललं जात आहे. तर या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी झाल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.