तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) :- नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॉट घेण्यासाठी टोकन व बुकिंग म्हणून दिलेले चार लाख ९५ हजार ३९० रुपये परत न देता खोटे दस्तऐवज देऊन वृद्धाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नाशिक येथील चार जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
गोपालसिंग भीमसिंग राजपूत (६६, रा. पिंप्राळा, जळगाव) यांची फसवणूक झाली आहे. सेवानिवृत्त असलेले गोपालसिंग राजपूत यांना प्लॉट घ्यायचा असल्याने त्यांनी ठाणगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील प्लॉटसाठी २ हजार २०० रुपये टोकन म्हणून दिले. बुकिंगसाठी दोन लाख ४० हजार ३९० रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या भागातील प्लॉट घेण्यासाठी २ लाख ५५ हजार रुपये दिले. असे एकूण चार लाख ९५ हजार ३९० रुपये धनादेश व रोखीने दिले होते.
मात्र, खरेदी खत करून न देता खोटे दस्तऐवज दिले. घेतलेली रक्कम देखील परत दिली नाही. राजपूत यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नाशिक येथील वैभवलक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा. लि., सदर कंपनीचे संचालक प्रशांत एन. शेंडे (५९), योगेश एन. शेंडे (४८), व्यवस्थापक राजेंद्र वसंतराव खैरनार (६१) सर्व रा. नाशिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








