अनेक जाहिरातींना केले अजरामर
मुंबई ( वृत्तसेवा ) :- ‘दो बुंदें जिंदगी की’, कुछ खास है, ‘हर घर कुछ कहता है’ अशा अनेक अविस्मरणीय जाहिरातींचे सर्जक पद्मश्री पियूष पांडे यांचे शुक्रवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. पांडे यांच्या निधनामुळे जाहिरातींना भारतीय चेहरामोहरा देणारा जाहिरात क्षेत्रातील पितामह हरपल्याची हळहळ जाहिरात, कला क्षेत्रातील नामवंत व्यक्त करत आहेत.
‘पियूष पांडे त्यांच्या सर्जनशीलतेसाठी ओळखले जात होते. त्यांनी जाहिरातीच्या जगात प्रचंड योगदान दिले. त्यांच्याशी वर्षानुवर्ष झालेल्या संवादांना मी जपून ठेवेन. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. शब्दांचा किमयागार, साक्षेपी व्यक्तिमत्त्वाला मुकलो, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पांडे यांच्याविषयी व्यक्त केली. ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ हे गीतही त्यांच्याच लेखणीतून साकारले होते. ‘अबकी बार मोदी सरकार’ हे घोषवाक्यही त्यांच्याच प्रतिभेचा आविष्कार होता. गंभीर संसर्गाने त्यांचे निधन झाल्याचे समजते.
‘अबकी बार, मोदी सरकार !’ या चारच शब्दांत दिवंगत पांडे यांनी जगातील एका मोठ्या लोकशाही राष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीत आगळी किमया साधली. त्यांच्या जाहिरातीनी भारतीय जाहिरात क्षेत्रात बदल आणले. फेव्हिकॉलची ट्रकची जाहिरात : फेव्हिक्विक आणि फेव्हिकॉलच्या जाहिरातींसाठी ‘तोडो नही, जोडो’ हे घोषवाक्य त्यांचेच होते. कॅडबरीची ‘क्रिकेट जाहिरात’, एशियन पेंट्सची ‘हर घर कुछ कहता है’, हच (व्होडाफोन) ची ‘पग जाहिरात’, गुगली वुगली वूश ! – पॉण्ड्स तसेच कॅडबरी डेअरी मिल्क साठी ‘कुछ खास है’, व्होडाफोनसाठी झूझू बाहुल्यांच्या जाहिराती या त्यांच्याच कल्पनेतून साकारल्या होत्या.
बजाज – ‘हमारा बजाज’, एअरटेल – ‘हर एक फ्रेंड जरुरी होता है’, ठंडा मतलब कोका-कोला हेदेखील त्यांचेच सृजन आहे. जाहिरात विश्वातील बडे प्रस्थ असलेल्या पियूष यांनी दीर्घ काळ ओगिल्वी इंडियाचे नेतृत्व केले होते. २०२३ मध्ये त्यांनी ओगिल्वी इंडियाच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून पायउतार होऊन सल्लागार भूमिका स्वीकारली. जाहिरात क्षेत्रात असलेले इंग्रजी भाषेचे वर्चस्व पांडे यांनी हिंदी आणि स्थानिक बोलीभाषांचा वापर करत मोडून काढले. उत्तम क्रिकेटपटू असलेले पियूष यांनी जाहिरात क्षेत्रात येण्याआधी क्रिकेटचे मैदान गाजवले होते. प्रारंभीच्या काळात त्यांनी बांधकाम क्षेत्रातही काम केले होते. अभिनेत्री गायिका इला अरुण या त्यांच्या भगिनी आणि प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक प्रसून पांडे हे भाऊ आहेत.
भारतीय जाहिरातींना जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून २०१८ मध्ये पियूष पांडे आणि त्यांचे बंधू प्रसून पांडे यांना कान लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटीमध्ये प्रतिष्ठित ‘लायन ऑफ सेंट मार्क’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१६ मध्ये केंद्र सरकारने पियूष यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय, २०२४ मध्ये त्यांना एलआयए लेजेंड पुरस्कार मिळाला. २०१३ मध्ये त्यांनी जॉन अब्राहम आणि नर्गिस फाखरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटात कॅबिनेट सेक्रेटरीची भूमिका साकारली होती.









