बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील घटना
बोदवड (प्रतिनिधी) : कन्येच्या लग्नाची पत्रिका वाटून घराकडे परतणाऱ्या पित्यासह दोन जणांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बोदवड-भुसावळ रस्त्यावर साळशिंगी नर्सरीजवळ गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ठार झालेले दोघे मामा-भाचे आहेत.
शिवाजी राजाराम काळबहिले (५०) आणि ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (३०, दोघे रा. साळशिंगी ता. बोदवड) अशी या मृतांची नावे आहेत. ते जळगावहून साळशिंगीकडे जात असताना हा अपघात झाला. शिवाजी काळबहिले यांच्या कन्येचा विवाह येत्या १७ फेब्रुवारीला होता. जळगाव येथे नातेवाइकांकडे लग्नाची पत्रिका वाटप करून मामा शिवाजी काळबहिले व भाचा ज्ञानेश्वर पाटील हे दुचाकीने साळशिंगीकडे परतत होते.
बोदवड-भुसावळ रस्त्यावर बोदवडपासून आठ किमी अंतरावर साळशिंगी नर्सरीनजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळ गाठले होते.