भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यात बाळद खुर्द गावात संपत्तीत हिस्सा मागितल्याच्या कारणावरून पित्यानेच मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला असून, या अमानुष कृत्यात पोलिसांनी त्याच्या भावालाही अटक केली आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
बाळू राजेंद्र शिंदे (वय २६) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने घरच्या वाटणीत अधिक हिस्सा मागितल्याने वाद उद्भवला. हा वाद क्षणातच मारहाणीत रूपांतरित झाला. पित्याने राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय ४८) आणि भाऊ भारत शिंदे (वय २२) यांनी बाळूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर आणि छातीवर जोरदार मारहाण करत त्याचा जीव घेतला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघा संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सुनिल लोटन पाटील (वय ५४, पोलीस पाटील, बाळद खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के आणि पोलीस नाईक महेंद्र चव्हाण करीत आहेत.