पारोळा महामार्गावरील घटना, फैजपूर येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : नाशिकहून फैजपूर येथे चारचाकी वाहनाने घरी जात असताना पारोळा गावाजवळ वाहन थांबून रस्त्यावर उभ्या असलेल्या चालकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. त्यांना जखमी अवस्थेत जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी दिनांक १२ जुलै रोजी रात्री ९ वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चंदू अरुण चौधरी( वय -४६, रा. फैजपूर ता.रावेर) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे. चंदू चौधरी हे फैजपूर येथे पत्नी आणि मुलगा यांच्यासह वास्तव्याला होते. सलून दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते.(केसीएन)त्यांचा मुलगा कल्पेश चौधरी याचे कॉम्प्युटर डिप्लोमासाठी नाशिक येथे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ते पत्नी ज्योती आणि मुलगा कल्पेश यांच्यासोबत चारचाकी वाहनाने दिनांक ६ जुलै रोजी सकाळी नाशिक येथे गेले होते. मुलाची महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून ते रात्री फैजपूर येथे जाण्यासाठी चार चाकी वाहनाने निघाले होते. दरम्यान दिनांक ७ जुलै रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ते पारोळा गावाजवळ आले.
त्यावेळी वाहन रस्त्याच्या कडेला लावून चंदू चौधरी हे रस्त्यावर उभे होते. अचानक त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.(केसीएन)त्यांना तातडीने जळगाव येतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दिनांक १२ जुलै रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या मृत्यू झाला.
त्यानंतर त्यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. शनिवारी १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.(केसीएन)या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कालसिंग बारेला हे करत आहे.