जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेचा कामधंद्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी सासरी छळ सुरू होता. याप्रकरणी पतीसह सुरत येथील सासरच्या मंडळींवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरजाना इरफान शेख (वय-२५), रा. मिठी खाडी, ता. जि. सुरत ह.मु. पिंप्राळा हुडको यांचा विवाह डिसेंबर २०१८ मध्ये सुरत येथील इरफान सत्तार शेख याच्याशी झाला. लग्नाचे काही दिवस सुखाचे गेल्यानंतर पती इरफानचे काम बंद झाले. काम का बंद झाले याची विचारणा केली असता पती शिवीगाळ करू लागला आणि कामाबद्दल विचार नये असा दम दिला.
कामधंद्यासाठी माहेरहून पैसे आणावे यासाठी अंगावर धावून येणे व शिवीगाळ करणे सुरू झाले. सासू रैमा सत्तार शेख, सलमा हनीफ शेख , साबीर सत्तार शेख, सासरे सत्तार शेख सर्व रा. मिठी खाडी जि. सुरत (गुजरात) यांनी पैश्यांसाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता फरजाना ह्या माहेरी पिंप्राळा येथे निघून आल्यात. याप्रकरणी त्यांनी रामानंदनगर पोलीसात पतीसह सासरकडील मंडळींच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.