भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमध्ये शोककळा
भुसावळ प्रतिनिधी):- तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घरातील इलेक्ट्रिक मोटार सुरू करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने धीरज कोळी या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

धीरज हा पिंपळगाव येथील श्रीरामनगर भागात वास्तव्यास होता. १ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी धीरज इलेक्ट्रिक मोटार प्लगमध्ये जोडत होता. त्याच वेळी त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का (शॉक) लागला. धक्का इतका भीषण होता की, त्याचा जागीच मृत्यू झाला.
ज्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली, त्यावेळी धीरजचे आई-वडील शेतात कामासाठी गेले होते आणि तो घरात एकटाच होता. आई-वडील घरी परतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. अचानक घडलेल्या या घटनेने कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धीरज हा ‘हरी किटकुल बढे प्राथमिक विद्यालया’त शिक्षण घेत होता. तो अभ्यासात अत्यंत हुशार, मनमिळाऊ आणि कष्टाळू विद्यार्थी म्हणून ओळखला जात असे. धीरजच्या पश्चात त्याचे आई-वडील, आजी आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे.









