पारोळा तालुक्यातील पिंपळ भैरव येथील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) : – पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र. अ.येथील ५४ वर्षीय शेतकऱ्याने पिंपळ भैरव ता. पारोळा शिवारातील शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ११ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात राहुल निंबा पाटील यांनी खबर दिली.

राहुल पाटील यांनी घरी असताना मला गावातील सतीष खंडू पाटील यांनी फोनद्वारे कळविले की, चुलत काका ज्ञानेश्वर हिंमत पाटील यांनी त्यांच्या पिंपळ भैरव ता. पारोळा शिवारातील शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतला आहे. यावेळी माझे वडील, माझे काका समाधान दंगल पाटील, निंबा राजमल पाटील शेतात गेले असता ज्ञानेश्वर हिंमत पाटील हे निंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेले दिसले. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना कुटीर रुग्णालय पारोळा येथे घेऊन गेलो असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील हटकर हे करीत आहेत.









