कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आवाहन
मुंबई (वृत्तसेवा) : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे . गत वर्षी खरीप २०२३ मध्ये राज्यातील विक्रमी असे १ कोटी ७० लाख विमा अर्ज द्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणा-या नुकसानीपासून शेतक-यांस आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून हि योजना राबविण्यात येत आहे . खरीप २०२४ हंगामात पेरण्या सुरु झाल्या आहेत . शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे . शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा , असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
विमा योजनेत समाविष्ट पिके भात(धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतक-यांना यात भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणा-या शेतक-यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणा-या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार उपलोड करणे आवश्यक आहे.योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७ , संबंधित विमा कंपनी , स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.