रावेर तालुक्यातील तांदलवाडी ग्रामस्थांचा निर्णय
रावेर (प्रतिनिधी) :- केळी उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. केळीच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. यामुळे केळी पीक विमा रक्कम मिळेपर्यंत राजकीय नेत्याना गावबंदी करण्याचा निर्णय संतप्त शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यांनी गावाच्या प्रवेशाजवळ घोषणाबाजी करून याबाबत माहिती दिली. रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील गावकऱ्यांच्या या निर्णयाने प्रशासनापुढे आव्हान आहे.
जळगाव जिल्ह्यात ८१ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित केळी पीक विमा काढला होता. यापैकी दहा ते पंधरा हजार शेतकऱ्याना केळी पीक विमा माध्यमातून नुकसान भरपाई मिळाली नाही. या संदर्भात केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शासन दरबारी तसेच राजकीय नेत्यांना भेटून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसून शेतकऱ्यांना पीक विमा रकमेची प्रतीक्षा आहे.