यावल तालुक्यातील किनगाव येथील घटना
यावल ( प्रतिनिधी ) – दिवाळी साजरी करण्यासाठी वापी येथून आपल्या गावी किनगावला आलेल्या २२ वर्षीय तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी किनगाव येथे घडली. बसस्थानकाजवळ भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आदित्य उर्फ बाळा प्रमोद पाटील (वय ३०,रा. किनगाव बु. ता.यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, दोन लहान भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे. बाळा हा वापी (गुजरात) येथे खासगी नोकरी करत होता. तो रविवारीच दिवाळीसाठी गावी परतला होता.सोमवारी दुपारी दुचाकीने (एमएच १९ ईजे २१७०) घरून निघाला होता. तेव्हा, यावलहून चोपड्याकडे विद्युत खांब घेऊन जाणाऱ्या पिकअप (एमएच १९ बीएम ४३२) ने त्याला जोरदार धडक दिली.
या धडकेत आदित्य गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आदित्य हा घरातील कर्ता सदस्य होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर पिकअप चालक यावल पोलीस ठाण्यात हजर झाला.









