पहूर (प्रतिनिधी) – लोंढरी तांडा व शेंगोळा येथे कापूस व्यापाऱ्यांनी दीडशे क्विंटलमागे २५ ते ३० क्विंटल कापूस चोरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पहूर पोलिसांनी व्यापाऱ्यांना अटक केली आहे.
लोंढरी तांडा आणि शेंगोळा येथे धुळे येथील व्यापारी कापूस खरेदीसाठी आले होते .शेंगोळा येथे कापूस खरेदी करून व्यापारी लोंढरी येथे आले. लोंढरी तांडा येथे कापूस मोजला जात असताना दर तोल मागे ९ ते १० किलो अशाप्रकारे क्विंटलमागे साधारण पंचवीस किलो कापूस शेतकऱ्यांचा कमी मोजला जात होता, मापात पाप होत असल्याची ही बाब लोंढरी तांडा येथील शेतकरी नामदेव राठोड यांच्या लक्षात आली. त्यांनी पोलीस पाटील यांचे पती पती डॉ. सुभाष चिकटे यांना माहिती दिली.
ही चोरी उघडकीस आल्याची खात्री होताच व्यापाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी त्यांना घरात कोंडून ठेवले. नामदेव राठोड यांनी पो नि अरुण धनवडे यांना माहिती दिल्यावर ते घटनास्थळी सहकाऱ्यांसमवेत आले व्यापाऱ्यांना त्यांच्या गाड्यांसह ताब्यात घेऊन पहूर पोलिस स्टेशन येथे आणले. या चोरीत ज्ञानेश्वर राठोड , शेषमल राठोड, आत्माराम राठोड, प्रकाश जाधव आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.कापूस मोजणी करत असताना मापात पाप करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त शेतकर्यांनी केली आहे.