पाचोरा तालुक्यातील भोजे येथील घटना
पाचोरा (जळगाव): शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या ‘झटका मशीन’च्या तारेचा स्पर्श होऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील भोजे येथे घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित शेतकरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण अमोल संतोष पाटील (उबाळे), (वय २५, रा. भोजे, ता. पाचोरा), हा दि. ८ मार्च २०२६ च्या सायंकाळी ४ वाजेपासून ते ९ मार्चच्या सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान शेतात गेला असता, आरोपी श्रीकृष्ण धनराज उबाळे यांच्या शेतात लावलेल्या झटका मशीनच्या तारांच्या संपर्कात आला. या तारांमधून विद्युत प्रवाह प्रवाहित होत असल्याने अमोलला जोराचा झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेबाबत मयताचे नातेवाईक संतोष शिवराम पाटील (उबाळे) यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्या शेतातील तारेला स्पर्श झाल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही आरोपीने निष्काळजीपणे या तारा लावल्या, ज्यामुळे ही दुर्घटना घडली.
पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार तपास करीत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी ९ मार्च रोजी रात्री १०.३० ते ११.३० च्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच सपोनि कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शेतात प्राण्यांपासून संरक्षणासाठी विद्युत प्रवाह सोडणे किंवा अनधिकृत झटका मशीन वापरणे कायदेशीर गुन्हा असून, यामुळे कोणाचा जीव गेल्यास संबंधित शेतकाऱ्याला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागते.









