राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकारी, एसपींना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांना बुधवारी गुंडांनी आ. किशोर पाटील यांचे नाव घेऊन बेदम मारहाण केली. या घटनेत मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत असलेले आ.किशोर पाटील यांनी चिथावणी दिल्यानेच मारहाण झाली असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादी काँगेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला आहे. हि घटना टीव्ही चॅनेल व सोशल मीडियावर मोठ्या संख्येने व्हायरल झाली आहे. या घटनेत संदीप महाजन यांच्या व परिवाराच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आ. किशोर पाटील व त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीदेखील निवेदनात आहे.
निवेदनावर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला शहर अध्यक्ष मंगला पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, डॉ. रिझवान खाटीक, अशोक सोनवणे, सुनील माळी, रिंकू चौधरी, नईम खाटीक, किरण राजपूत, मतीन सय्यद, संजय जाधव, कुंदन सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.