चाळीसगावात गुंडांचा हैदोस
चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरातील अत्यंत गजबजलेल्या स्टेशन रोड परिसरात गुन्हेगारांचे धाडस वाढले असून, एका पत्रकाराचा मोबाईल भररस्त्यात हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महेंद्र तुकाराम सूर्यवंशी (वय ४६), जे व्यवसायाने पत्रकार आहेत, ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९:१० वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील ‘डिजिटल प्रेस मीडिया’ कार्यालयासमोर उभे होते. यावेळी मागून आलेल्या एका काळ्या रंगाच्या विना क्रमांकाच्या पल्सर (Pulsar) मोटारसायकलवरील दोन तरुणांनी त्यांच्या हातातील मोबाईल जोरात हिसकावून नेला. चोरट्यांनी पळवलेला मोबाईल ‘ओप्पो’ कंपनीचा असून त्याची किंमत सुमारे १८ हजार रुपये आहे. त्यामध्ये महत्त्वाचे सिमकार्ड आणि डेटा असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. दोन्ही आरोपींचे वय अंदाजे २४ ते २५ वर्षे असून, त्यांनी अत्यंत वेगाने दुचाकी चालवत पलायन केले.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनेची तक्रार ११ फेब्रुवारी रोजी नोंदवण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक नितीन साहेबराव अगोणे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनैरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.









