पतीचीही आत्महत्या : जामनेर, मलकापूर तालुक्यात प्रचंड खळबळ
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे माहेरी आलेल्या पत्नी व ९ महिन्याच्या मुलीचा पतीने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना दि. १२ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरु होते. या घटनेनंतर फरार झालेल्या पतीने त्याच्या मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
प्रतिभा विशाल झनके (वय २०) व ९ महिन्याची मुलगी दिव्या विशाल झनके असे मयत आई व मुलीचे नाव आहे. त्यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. या वादामुळे प्रतिभा या माहेरी जामनेर तालुक्यात देऊळगाव गुजरी येथे राहत होत्या. दरम्यान, शुक्रवारी दि. १२ एप्रिल रोजी प्रतिभा हिचा पती विशाल मधुकर झनके (वय २५, रा. दुधलगाव ता. मलकापूर जिल्हा बुलढाणा) हा दुपारी देऊळगाव गुजरी येथे आला होता. यावेळी त्याचे पत्नी प्रतिभा हिच्याशी पुन्हा वाद झाला. या वादातून विशाल झनके याने टोकाची भूमिका घेतली.
विशालने पत्नी प्रतिभा हिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. त्यानंतर ९ महिन्याचे बाळ दिव्या हिचाही धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. यानंतर विशाल झनके हा फरार झाला. त्याने गावाकडे म्हणजे दुधलगाव येथे जाऊन आत्महत्या केली करून जीवन संपवले. देऊळगाव गुजरीत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रतिभा हिच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हा मन हेलावणारा होता. पोलिसांनी मृतदेह जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन केले. यानंतर फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. तपास सपोनि गणेश फड करीत आहे.