चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रोहिणी येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे.
भारताबाई कैलास गायकवाड (३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पती कैलास एकनाथ गायकवाड (३८, रा. ओझर, ता. चाळीसगाव) याला अटक केली. कैलास हा पत्नी भारताबाई हिच्यावर संशय घेऊन वाद घालत होता, तसेच मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. या प्रकारास कंटाळून ती मुलगी योगिता हिच्यासोबत माहेरी रोहिणी येथे निघून आली होती. त्यानंतर, दोन-तीन दिवसांपूर्वी भारताबाई हिच्या वडिलांनी जावई कैलास याला घरी बोलावून घेतले. त्यावेळी परिवारातील सर्वांनी त्याची समजूत काढत रोहिणी येथेच राहण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे तो तिथेच राहू लागला.
शनिवारी कैलास व भारता यांच्यात पुन्हा वाद झाला. यात कैलासने भारताबाईच्या डोक्यात दगड टाकून खून केला. काही वेळानंतर हा प्रकार लक्षात येताच, भाऊ व नातेवाइकांनी भारताबाईस ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रीच कैलास गायकवाड याला अटक केली आहे. या प्रकरणी भारताबाई हिचा भाऊ गणेश माळी यांच्या फिर्यादीवरून कैलास एकनाथ गायकवाड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.